आयुर्वेदिक म्हटल्या बरोबर आपल्या मनात प्रथम येतं “परिणाम हळू होत असला तरी साईड-इफेक्ट नसतात”. आयुर्वेदामधे अतिशय जलद परिणामकारी औषधे आहेत ह्यावर आपला आता नक्की विश्वास बसेल.
१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यसाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवा सारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.
४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी सखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.