पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी त्यांचे इटलीचे समकक्ष मारिओ ड्रॅगी यांच्याशी चर्चा केली आणि तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर उद्भवलेल्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वित प्रयत्नांच्या गरजेवर भर दिला. पंतप्रधान मोदींनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी यांच्याशी बोललो आणि अफगाणिस्तानच्या ताज्या परिस्थितीवर समन्वित आंतरराष्ट्रीय प्रयत्नांच्या गरजेवर चर्चा केली. आम्ही जी २० मध्ये सहकार्य आणि हवामान बदल यासारख्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली.
दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी चर्चेदरम्यान अफगाणिस्तानमधील ताज्या परिस्थितीवर आणि जगावर आणि क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली. पीएमओच्या म्हणण्यानुसार, दोन्ही नेत्यांनी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि तेथे अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यावर भर दिला गेला आहे.
पीएमओने म्हटले आहे की, जी २० मध्ये चर्चा यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी इटलीच्या उत्कृष्ट नेतृत्वाचे कौतुक केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर विशेषत: अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर संपर्कात राहण्याचे मान्य केले. अफगाणिस्तानमधील बिघडत चाललेली परिस्थिती पाहता पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा करत आहेत. यापूर्वी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांच्याशी चर्चा केली होती.